Get new posts by email:

“अभिनयााचे नवरस”

प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात हे स्थायीभाव कमी-अधिक प्रमाणात सुप्त अवस्थेत असतात. लेखकाने लिहिलेले वाङ्‍मय वाचत असताना वाचकाच्या किंवा नाटक पाहताना प्रेक्षकाच्या अंतःकरणातील या भावना जागृत होतात, तेव्हा रस निर्माण झाला असे म्हटले जाते. आपल्या अंतःकरणातील स्थायीभाव हे वाचनाने किंवा कलाकृतीच्या दर्शनाने जागृत होतात. ज्या वेळी आपली एखादी भावना जागृत झाली तेव्हा तो रस निर्माण झाला असे समजावे. हे रस एकूण नऊ आहेत, त्यांची नावे पुढीलप्रमाणे:
१) शृंगार
२) वीर
३) करूण
४) रौद्र
५) हास्य
६) भयानक
७) बीभस
८) अद्‍भुत
९) शम (शांती).
या नवरसांबद्दल आता थोडे जाणून घेऊ:
१) शृंगार (शृंग ~ कामवासना) : स्त्री-पुरूषांना एकमेकांना वाटणार्‍या प्रेमातून, आकर्षणातून या रसाची उत्पत्ती होते. पुढील चरण पाहा:
१) डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नका.
२) सहज सख्या एकदाच येई सांजवेळी.
३) कच्चं डाळींब फुटंऽऽ ओठात…
४) या कातर वेळी पाहिजेस तू जवळी.
यांसारखे चरण ऐकता्ना जी वैषयिक भावना जागृत होते, तेव्हा जो शृंगाररस निर्माण होतो, त्याला उत्तान शृंगार म्हणतात. ‘सहज तुझी हालचाल मंत्रे जणु मोहिते’ यासारख्या चरणातून सोज्ज्वळ पत्नीप्रेमाने निर्माण होणारा तो “सात्विक शॄंगार”, प्रेमाच्या विफलतेतून निर्माण होणारा तो “विप्रलंभ शॄंगार”. बहुधा लावणी हा प्रकार शृंगार रस परिपोषक.
२) वीर : उत्साह हा रसाचा स्थायीभाव. पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांतून हा रस निर्माण होतो. उदाहरणार्थ:
१) जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा!
२) जय भवानीऽऽ, जय शिवाजीऽऽ!
३) हर हर… महाऽऽदेव..!
४) वन्देऽऽऽ… माऽतरम्…!
यांसारखी समरगीते आणि पोवाडे ह्यांत हा वीररस पाहावयास मिळतो.
३) करूण : शोक किंवा दुःख, वियोग, संकट यांतून हा रस निर्माण होतो. हृदयद्रावक अशा गोष्टींच्या वर्णनांत हा रस आढळतो. उदाहरणार्थ:
१) खेळ मांडला (नटरंग-२००९) हे गाणे.
२) टिंग्या, श्वास हे करूण चित्रपट.
३) पोर खाटेवर मृत्युच्याच दारा सारखी कविता.
४) हास्य : विसंगती, असंबद्ध भाषण, व्यंगदर्शन, विडंबन, चेष्टा यांच्या वर्णनांतून हा रस निर्माण होतो. उदाहरणार्थ:
१) “खायचे दात वेगळे आन् दाखवायचे वेगळे!” या प्रकारच्या अतिशयोक्ती निर्माण करणार्‍या म्हणी.
२) “केसाने गळा कापणे” यांसारख्या वाक्प्रचारांचा दैनंदिन वाक्यात उपयोग केल्याने हास्य हा रस उत्पन्न होतो.
३) पु.लं.च्या बहुतेक पुस्तकांमध्ये हा रस आढळतो.
५) रौद्र : अतिशय क्रोध, राग, द्वेष, मत्सर, तिरस्कार किंवा चीड या भावनेतून हा रस निर्माण होतो. उदाहरणार्थ:
पाड सिंहासने दुष्ट ती पालथी,
ओढ हत्तीवरूनि मत्त नृप खालती,
मुकुट रंकासि दे, करटि भूपाप्रती,
झाड खट्खट्‍ तुझे खड्ग रुद्रा.
६) भयानक : भीती या भावनेतून हा रस निर्माण होतो. युद्ध, मृत्यू, खून, सूड, भूत, स्मशान इत्यांदीच्या वर्णनांतून हा रस आढळतो. युद्धकथा, रहस्यकथा, भीतिकथा यांमधील वर्णनांतून हा रस बघावयास मिळतो.
७) बीभत्स : किळस, वीट, तिटकारा, अश्लिल वर्णन करणार्‍या कवितांतून, लेखांतून, चित्रपटांतून, गाण्यांतून किंवा वर्णनातून हा रस आढळतो. उदाहरणार्थ:
ही बोटे चघळीत काय बसले – हे राम रे – लाळ ही!
काळी काय गळ्यातुनी जळमटे आहेत पन्नास ही,
शीऽ! शीऽ! तोंड अती अमंगळ असे आधीच हे शेंबडे,
आणी काजळ ओघळे वरूनि हे, त्यातुनि ही हे रडे!
८) अद्‍भूत : विस्मय हा या रसाचा स्थायीभाव, परींच्या कथा, अरेबियन नाइट्स, अलिबाबा व चाळीस चोर, जेम्स बॉण्डच्या साहसकथा इत्यादींच्या वर्णनातून हा रस आढळतो. पुढील ओळी पाहा:
आटपाट नगरात दुधाचे तळे
तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे
नगरातले लोक सारेच वेडे
वेड्यांनी बांधलेत बर्फीचे वाडे
आंघोळीला पाणी घेतात दुधाचे
डोक्याला तेल लावतात मधाचे
फणस-पोळीचे कपडे घालतात
सारेच वेडे उलटे चालतात!
९) शांत : परमेश्वरविषयक भक्ती/श्रद्धा, सत्पुरुषांची संगती, देवालय किंवा आश्रम यांच्या परिसरातील वातावरण यांच्या वर्णनातून हा रस आढळतो. उदाहरणार्थ:
१) घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला.
२) उठि गोपालजी, जाई धेनूकडे, पाहती सौंगडे वाट तूझी.
३) आता विश्वात्मके देवें । येणे वान्यज्ञे तोषावे । तोषोनि मज द्यावे । पसायदान हे ॥
यांसारख्या चरणांतून व भूपाळ्यांतून शांत रसाचा प्रत्यय येतो.

संदर्भ: “सुगम मराठी व्याकरण लेखन”

You may also like

No Comment

You can post first response comment.

Leave A Comment

Please enter your name. Please enter an valid email address. Please enter a message.